नाशिक – नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल व त्र्यंबकेश्वरच्या काही भागात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भूकंपांच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी नागपूरच्या जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे भूगर्भशास्त्रज्ञ हर्षराज वानखेडे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ते २१ जानेवारीपर्यंत सर्व जागांचा अभ्यास करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत.
गेल्या वर्षीच्या २४ डिसेंबर व २ जानेवारी रोजी पेठ, हरसूल व सुरगाणात दोन भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या गावांमध्ये रात्री जमिनीतून मोठा आवाजही आला होता. याच घटनेची पुनरावृत्ती पेठ तालुक्यातील मानकापूर, आडगाव भुवन धानपाडा सह इतर गावांमध्येही झाली होती. मेरी येथील भूकंपमापकावर त्याची नोंदही झाली होती. नाशिक जिल्ह्याची भौगोलिक रचना वेगळी असल्याने अशा प्रकारचे धक्के जाणवले असावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. याचा धोका किती मोठा आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. २१ जानेवारीपर्यंत याचा अभ्यास केला जाणार आहे.