नवी मुंबई बाजारात आवक वाढल्याने डाळींचे भाव घसरले

नवी मुंबई- वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी, कडधान्यांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. या बाजार समिती आवारात चणाडाळ १२ टक्के तर तूरडाळ ५ टक्के आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव १४ टक्क्यांनी उतरले आहेत.
गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने त्याचा कडधान्य उत्पादनावर परिणाम होऊन डाळीच्या दरात बरीच सुधारणा झाली होती. किरकोळ बाजारात तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांनी २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने डाळींना चांगले दिवस आले आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होत आहेत. कर्नाटकातही तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूरडाळीच्या भावात प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १६० ते २०० रुपये; तर हिरवा वाटाणा २५० रुपयांनी विक्री होत होता. आता नवीन उत्पादन आल्याने तूरडाळ ११० ते १२० रुपये तर हिरवा वाटाणा १२० रुपयांवर उतरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top