मुंबई – घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी परवानग्या मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तांना लाच दिल्याचा आरोप करणाऱ्या पोलिसांनी संबंधित पोलीस आयुक्तांच्या नावाचा समावेश आरोपपत्रामध्ये का केला नाही,असा सवाल करत या प्रकरणातील एका आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित करून जामीनावर मुक्त करण्याची विनंती केली.
अर्शद खान असे या आरोपीचे नाव आहे.घाटकोपरमधील कोसळलेले होर्डिंग इगो मीडिया या कंपनीने उभारले होते. ते होर्डिंग उभारताना आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यासाठी अर्शद खान याच्या मार्फत पोलीस आयुक्तांना लाच देण्यात आली. अर्शद खान याने पोलीस आयुक्तांशी संगनमत करून आवश्यक त्या परवानग्या इगो मीडिया कंपनीला मिळवून दिल्या. या कामासाठी त्याने इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे आणि जन्हवी मराठे यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले,असा पोलिसांचा आरोप आहे.
अर्शद खान याच्या वकील अॅड सना रईस खान यांनी नेमके याच मुद्यावर बोट ठेवत पोलिसांवर पक्षपातीपणे तपास केल्याचा आरोप केला. आरोपी अर्शद खान याने जर पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून होर्डिंगसाठी आवश्यक त्या परवानग्या गैरमार्गाने मिळवल्या,असा पोलिसांचा आरोप आहे तर मग लाच घेऊन परवानग्या देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होणे आवश्यक ठरते.मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव का नाही,असा सवाल अॅड सना खान यांनी उपस्थित केला. या खटल्यात अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे समानतेच्या तत्वानुसार अर्शद खान यालाही जामीन देण्यात यावा,अशी विनंतीही अॅड सना खान यांनी केली. १३ मे २०२३ रोजी घाटकोपरमधील जीआरपी मैदानावर इगो मीडियाने उभारलेले १२० बाय १४० फुटांचे भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या होर्डिंगखाली चिरडून १७ निष्पाप नागरिकांना बळी गेला होता.तर सुमारे ७० जण जखमी झाले होते.हा अपघात घडल्यानंतर अर्शद खान फरार झाला होता. त्याला डिसेंबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली .