देशात महागाईचा दहशतवाद प्रियांका गाधींचा हल्लाबोल

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर चालवणाऱ्या महिलांचा जीव या दहशतवादाचा सामना करताना मेटाकुटीला येतो असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज शिर्डी येथील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारसभेत केला.त्या म्हणाल्या की, एका बाजूला सरकार महागाई वाढवून तुम्हाला त्रास देत आहे. आज घराची दुरुस्ती करायची असेल, घरातील कोणी आजारी असेल, तर महिलांना त्रास होतो. त्यावर ते केवळ महिना १५०० रुपये तुम्हाला दिल्याचे सांगतात. आज १५०० रुपयात काय होते? तुम्हाला जर महिलांची एवढीच काळजी होती तर तुम्ही सिलिंडरचे भाव कमी का केले नाहीत ? महागाई का रोखली नाही? महिला या साऱ्या संकटांवर मात करत आपले घर चालवतात, मुलांना मोठे करतात. नंतर त्यांना कळते की, मुलांना नोकरीच नाही. त्यावर हे सरकार काहीही म्हणत नाही. करत नाही. शेतकऱ्यांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. सोयाबीनला भाव दिला नाही. कापूस, कांदा उत्पादकांनाही वाऱ्यावर सोडले आहे. यांनी जीएसटीमुळे सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना केवळ बरबाद करण्याचे काम केले. या सरकारने ५० लाख टन कापूस वाया घालवला. मोदींच्या धोरणांनी देशाला कमजोर केले. महाराष्ट्रातील जनता कष्टाळू आहे. तिच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा आहे. तिला संधी दिल्यास ते कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण करते, हे आपण पाहिले आहे. संविधानाने तुम्हाला दिलेल्या सर्वोच्च अशा मताच्या अधिकाराचा वापर करून या सरकारला आता घरी पाठवले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top