देशमुखांना क्लीनचिट नाही! फडणवीस टार्गेट निवडणूक काळात न्या. चांदिवाल का बोलले?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांना उघडे पाडण्यासाठी नेते मंडळी वाट्टेल त्या थराला जात आहेत. जोरदार चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीत आज माजी न्यायाधीश चांदिवालही उतरले. मविआ सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणाची चौकशी करणारे चांदिवाल यांनी आज दोन वर्षांनी थेट मुलाखत देत गोपनीय गोष्टी उघड केल्या. यामुळे मविआला धक्का बसावा हे यामागचे नियोजन आहे असे वाटते.
ते म्हणाले की, या अहवालात मी देशमुख यांना क्लीनचिट दिलेली नाही, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता, वाझेने शपथपत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचे नाव घेतले होते, पण त्याचा पुरावा मिळाला नाही, परमवीरसिंग यांनी ऐकीव माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या मुलाने 40 लाख रुपयांबाबत वाझेला मेसेज पाठवला होता तो मी पाहिला अशी सर्व पुरावा नसलेली त्यांना मिळालेली गोपनीय माहिती चांदिवाल यांनी उघड केली.
वास्तविक चांदिवाल यांचा 2022 सालचा अहवाल मविआ किंवा महायुती सरकारने अद्याप सार्वजनिक केलेला नाही. असे असताना या गोपनीय माहिती स्वतः न्यायाधीश राहिलेले चांदिवाल यांनी उघड केली. पुरावे नसल्याने त्यांनी यातील अनेक गोष्टी अहवालात नमूद केलेल्या नाहीत, पण मुलाखतीत सांगितल्या. या गोष्टी मविआसाठी घातक आहेत. त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
न्या. चांदिवाल यांनी चौकशी सुरू झाल्यापासून आपली पदोपदी कशी अडवणूक करण्यात आली याचा पाढाच वाचला. ते म्हणाले की चौकशी सुरू केल्यापासून माझ्यासमोर अनेक अडचणी येत होत्या किंवा आणल्या जात होत्या. पोलीस आणि सरकारी अधिकारी सहकार्य करत नव्हते. साक्षी पुरावे माझ्यासमोर आणलेच जात नव्हते. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले बहुतांश आरोप ऐकीव स्वरुपाचे होते. त्यांना माझ्यासमोर हजर करा असे मी वारंवार पोलिसांना सांगितले. पण ते बेपत्ता झाले आहेत, असे उत्तर सीआयडी देत होती. सचिन वाझे यांच्याकडे बरीच माहिती होती. मात्र त्या माहितीची सत्यता पटवता येईल असे भक्कम पुरावे त्यांनी माझ्यासमोर आणले नाही. त्यांनी शपथपत्रावर अजित पवार आणि शरद पवार यांची नावे घेतली. पण साक्षीत त्यांची नावे घेतली नाहीत. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले बहुतांश आरोप ऐकीव स्वरुपाचे होते. अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख कसा हस्तक्षेप करतात याच्या तक्रारी त्यांच्याकडे अनेक कनिष्ठ अधिकार्‍यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. पण ते आरोप सिध्द करण्यासाठी कागदोपत्री पुरावे त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे मी अनिल देशमुख यांच्याविरुध्द ठोस पुरावे नाहीत, एवढेच अहवालात म्हटले. मी कुठेही ते निर्दोष आहेत असे म्हटलेले नाही. किंवा त्यांना क्लीनचिट दिलेली नाही, असे न्या. चांदिवाल म्हणाले. माझ्यासमोर जे काही चालले होते ते मला स्पष्ट दिसत होते. कुठे तरी पाणी मुरत आहे हे मला समजत होते. मात्र कोण कोणाला वाचवायचा प्रयत्न करीत आहे हे समोर येत नव्हते. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप,’ असा सारा प्रकार माझ्यासमोर सुरू होता.ठाण्यातील एका पोलीस उपायुक्त व एक वकील हे समितीच्या कामात वारंवार हस्तक्षेप करीत होते. परमवीर सिंग आणि वाझे यांची भेट झाली, अनिल देशमुख आणि वाझे यांचीही भेट झाल्याचे कळले असा आरोप न्या. चांदिवाल यांनी केला.

नव्याने सीबीआय चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
न्या. चांदिवाल यांच्या या गौप्यस्फोटानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, असे सांगत या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. ’आरोपी आणि साक्षीदार यांची भेट स्वतः पोलीस उपायुक्त घडवून आणत होते, असे न्या.चांदिवाल म्हणतात. हा मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराचा ढळढळीत पुरावा आहे. हे प्रकरण आता अत्यंत गंभीर बनले आहे. याची पुन्हा नव्याने सीबीआय चौकशी झाली पाहिजे’,असे फडणवीस म्हणाले.

सलिल देशमुखांचा मेसेज
चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी मला पुरावा म्हणून अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज दाखविला. त्यामध्ये 40 लाख रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख होता. पण तो ठोस पुरावा ठरू शकला नसता म्हणून मी ते रेकॉर्डवर घेतले नाही, असे न्या.चांदिवाला यांनी सांगितले. त्यामुळे न्या. चांदिवाल हे अनिल देशमुख यांना टार्गेट करू पाहात आहेत, असे चित्र निर्माण झाले. कारण ज्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचा पुरावा म्हणून उपयोग होणार नाही हे माहिती होते त्या मेसेजबद्दल न्या. चांदिवाल का बोलले हा सवाल उपस्थित होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top