पणजी- गोव्याचे तत्कालिन तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून येथील मोरजाई देवस्थान परिसरात खिंड येथे आकर्षक उद्यान उभारले,परंतु आज या उद्यानाची बिकट अवस्था आहे.गेले सहा महिने दुरुस्तीच्या नावाखाली हे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
या उद्यानाकडे पर्यटन महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे उद्यानाची स्थिती सध्या भयानक झाली आहे. बालगोपाळांच्या खेळण्याची साधने याठिकाणी होती,त्या साधनांना गंज चढला आहे. काही घसरगुंड्या मोडकळीस आल्या आहेत. योगा सेंटरसाठी काही जागा आरक्षित ठेवली होती, त्या ठिकाणी सध्या केरकचरा साचला आहे.हे उद्यान लाखो रुपये खर्च करून बाकीया कन्स्ट्रक्शनने उभारले होते. मात्र सुरवातीपासून या उद्यानाची देखरेख झाली नाही.सध्या हे उद्यान बाकीया कन्स्ट्रक्शनने भाडेपट्टीवर घेतल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. मागच्या सहा महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली उद्यान बंद ठेवले आहे. परंतु गेल्या सहा महिन्यात काहीही काम येथे झालेले नाही, त्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.