पुणे – पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूम मालकांना आता ग्राहकांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शोरूम मालकांना पत्रकाद्वारे याबाबत आदेश दिले आहेत. भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. रस्त्यावर होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे.
वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३८ नुसार नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी शोरूम मालकांना सूचना केल्या आहेत. दुचाकी खरेदीनंतर दोन हेल्मेट घ्यावीत, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरीकांना आवाहन केले आहे.