सेऊल -दक्षिण कोरियातील सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीचे ३० हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सुधारित वेतन व इतर सुविधांसाठी त्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. तीन दिवसांच्या इशारा संपानंतर या बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे.
कामगार संघटनेने म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थापनाला आमच्याशी चर्चा करण्यात काही रस दिसत नाही असे आढळून आले आहे. त्यामुळे हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पहिल्या सार्वत्रिक संपानंतरही व्यवस्थापनाने आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही. या संपामध्ये आतापर्यंत साडेसहा हजार कर्मचारी सहभागी झाले असून इतर कर्मचारीही एक एक करून सहभागी होत आहेत. या संपाच्या घोषणेनंतर सॅमसंगच्या समभागांच्या दरातही काही प्रमाणात घसरण झाली आहे.
सॅमसंगच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, आपली कामगार संघटनेबरोबर योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनीच्या उत्पादनक्षमतेवर या संपाचा परिणाम होणार नाही. या संपात किती कर्मचारी सहभागी झालेले आहेत याची, निश्चित आकडेवारी सांगता येणार नाही.