चेन्नई – तामिळनाडूत वाईटाचा नायनाट व्हावा व सत्ताधारी द्रमुकचा पाडाव होण्यासाठी तामिळनाडू भाजपा अध्यक्ष अण्णामलाई यांनी काल आत्मक्लेष आंदोलन केले. त्यांनी त्यांच्या कोईम्बतुर येथील निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे सहा फटके मारून घेत हे आंदोलन केले.
तामिळनाडूतील द्रमुक सरकारवर टीका करण्यासाठी त्यांनी परवा एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आपण द्रमुक सरकारच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन करणार आहोत. राज्यात जो पर्यंत द्रमुकचा पाडाव होत नाही तोपर्यंत चप्पलही घालणार नाही. त्याचप्रमाणे राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व म्हणजेच सहा पवित्र स्थानी ४८ दिवस उपवास करणार आहे. कोईम्बतूर येथील आपल्या गावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी द्रमुक सरकारवर जोरदार टीका केली. अण्णा विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराबद्दलही त्यांनी सरकारला जबाबदार धरले.