आनंद – गुजरात सहकारी दूध संघटना अर्थात अमूल च्या १०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी काल अमूलच्या आनंद येथील प्रकल्पासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. अमूलच्या खेडा येथील १०० कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाने चार महिन्यांपूर्वी कोणतेही कारण न देता तडकाफडकी काढून टाकले होते. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी अमूलच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाला करणी सेनेने पाठिंबा दिला.
माजी अधिकारी राजेंद्रसिंह परमार यांनी व्यवस्थापनाला विनंती केली आहे की कामावरुन काढून टाकलेल्या या १०५ कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत कामावर घेण्याची मागणी यात करण्यात आली असून आपली मागणी मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी आपली ५ ते ८ वर्षे दिलेली आहेत. त्यांना काढून टाकण्याबाबत कंपनीने काही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीच्या एकनिष्ठ कामगारांना काढून टाकल्याने त्यांच्यावर आर्थिक व भावनिक अन्याय करण्यासारखे आहे. या आंदोलनामुळे आनंद मध्ये तणाव निर्माण झाला असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी अमूलचे व्यवस्थापकीय संचालक अमीत व्यास यांनाही पत्र देण्यात आले आहे.