मुंबई – विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सगळ्याच पक्षांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे हे भाजपाशी युती करण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे ‘एकला चलो रे’ ची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबई पालिका स्वबळावर निवडणुका लढण्याची शक्यता आहे .
शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवली. लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. आता महापालिका निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर आज झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकार्यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवल्याची माहिती आहे. युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकार्यांना न्याय मिळत नाही. स्वबळावर लढल्यास आपले उमेदवार मोठ्या संख्येने महापालिका निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास पदाधिकार्यांनी दर्शवला. विधानसभा निवडणुकीत काही जागांवर काँग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मदत केली नाही अशीही तक्रार केली . काही जागांवर शेवटपर्यंत काँग्रेस आग्रही राहिल्याने जागा वाटपाचा गोंधळ झाला . याचा फटका काही ठिकाणी बसला. त्यामुळे महापालिका निवडणुकीला मविआत निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याचे दृष्टिकोनातून स्वबळावर लढावे असे बहुतांश पदाधिकार्यांचे म्हणणे असल्याची माहिती आहे. उध्दव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत .
ठाकरे गट मुंबई पालिका स्वबळावर लढणार?
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/uddhav.jpg)