मुंबई – अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा येत्या २० जानेवारी रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण जगभरातील अनेक देशांच्या प्रमुखांना पाठवली जात आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अद्याप निमंत्रण आलेले नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. मणिपूर आणि लडाखकडे पाठ फिरवून ट्रम्प यांच्या सोहळ्याकडे डोळे लावून बसलेले विश्वगुरू सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आतूर झाले आहेत,अशा शब्दात राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.
देशाचे परराष्ट्रमंत्री गेले सुमारे पंधरा दिवस व्हाईटहाऊसच्या बाहेर याचकासारखे उभे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ट्रम्प यांच्याकडून निमंत्रण घेऊनच या, असे त्यांना सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांनी आखातातील छोट्या छोट्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठविले आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाही निमंत्रण पाठविले आहे. पण अद्याप आपल्याला निमंत्रण न आल्याने विश्वगुरू अस्वस्थ झाले आहेत,असे राऊत म्हणाले.
ट्रम्प यांच्या सोहळ्याकडे बघत बसण्यापेक्षा मोदींनी हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरला जावे, लडाखचा काही भूभाग चीनने गिळंकृत केला आहे, तिथे जाऊन काहीतरी ठोस निर्णय घ्या,असा सल्लाही राऊत यांनी मोदी यांना दिला.