सोलापूर- सोलापूर-हैदराबाद रोडच्या दिशेने जाणार्या सिमेंट बल्करचे टायर फुटून बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या भीषण अपघातात बल्करने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातातील मृतांची नावे-तोहिद माजीद कुरेशी (२०), रा.सरवदे नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान (४५), रा. दर्गे पाटील नगर, हैदराबाद रोड तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज ,रा.सोलापूर अशी नावे आहेत. शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने हा सिमेंट बल्कर जात होता. हा बल्कर सोलापूर-हैदराबाद रोडवरील हॉटेल जगदंबा येथे आला. त्यावेळी बल्करचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने बल्करने दुचाकीला धडक देत तो थेट उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसला. यावेळी गॅरेजमध्ये काही लोक बसलेले होते. या सर्व लोकांना बल्करने चिरडले. जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या परिसरात अपघात झाला,त्या रस्त्यावर वळण मार्ग आहे. हीच बाब या अपघाताला कारणीभूत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.