नवी दिल्ली
ऑनलाइन फूड डिलीवरी करणारी कंपनी झोमॅटोला कर्नाटकच्या वाणिज्य कर (ऑडिट) सहायक आयुक्तांनी ९.४५ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीची नोटीस बजावली आहे. झोमॅटोकडे ५.०१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्यासोबत ३.३९ कोटी रुपयांचे व्याज आणि ५०.१९ लाख रुपयांचा दंडही कंपनीला ठोठावला आहे. त्यामुळे सहायक आयुक्तांनी झोमॅटोला ९.४५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यास सांगितले.
झोमॅटोला २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसला झोमॅटोने सविस्तर स्पष्टीकरण आणि संबंधित कागदपत्रांसह उत्तर दिले आहे. झोमॅटो कंपनीला नोटीस मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. झोमॅटोला २०२१ मध्ये गुरुग्राममधील केंद्रीय माल आणि सेवा कर अतिरिक्त आयुक्तांकडून नोटीस मिळाली होती. त्यावेळी झोमॅटोला ला व्याज आणि दंडाच्या रक्कमेसह ११.८२ कोटी रुपये जमा करण्याचे नोटिसीत म्हटले होते. त्यावेळीही कंपनीने नोटीसीविरोधात आपील केले होते.