ठाणे – आपल्या हॉटेलच्या समोर असलेल्या झाडांवर विद्युत दिव्यांची रोषणाई केल्याने काशिमीरा येथील एक हॉटेल मालक अडचणीत आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. असा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे मुंबईत जी २० बैठक होती तेव्हा सुशोभीकरणाच्या नावाखाली सरकारनेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर दिव्यांनी रोषणाई केली होती.
तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही. मीरा रोड येथील एमआयडीसी मार्गावरील हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोर झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.पर्यावरण जागृतीसाठी काम करणाऱ्या ‘फॉर फ्युचर इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक हर्षल ढगे यांनी यावर आक्षेप घेत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती.त्या तक्रारीची दखल घेत पालिका आयुक्त संजय काटकर यांनी वृक्ष प्राधिकरणाला चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्यान्वये हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे.