मुंबई – भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांची भाषणे झाली. यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सगळ्यांच्या भुवया उंचवणारे ठरले. कारण आपल्या भाषणात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अमाप स्तुती केली आणि खोचकपणे का होईना, पण देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. नार्वेकर यांच्या निकालाने शिवसेनेची फूट अधिकृत झाल्याने उबाठा गट त्यांच्यावर संतप्त आहे. असे असूनही जयंत पाटील यांनी त्यांची स्तुती केल्याने जयंत पाटील हे शरद पवार गट सोडून अजित पवार गट किंवा भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाली.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या तिसर्या आणि अंतिम दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अॅड. राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. त्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव
मांडला. त्याला आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलआमदारांची भाषणे झाली. त्यावेळी जयंत पाटील आपल्या भाषणात राहुल नार्वेकरांविषयी अगदी भरभरून बोलले. ते म्हणाले की, राहुल नार्वेकर सलग दुसर्यांदा निवडून आले आहेत. सलग दुसर्यांदा तुमची अध्यक्षपदी निवड होत आहे, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला नेहमी खासगीत सांगायचो की, परत संधी मिळाली की, मंत्री व्हा. तुम्ही मंत्री झाल्यास जास्त चांगले होईल. पण तुम्हाला अध्यक्ष करणे हा तुमच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे मला या विषयाच्या खोलात जायचे नाही. पण तुम्ही हे पद स्वत:च्या कर्तबगारीवर मिळवलेले आहे. विधानसभेचे अध्यक्ष झाल्यापासून अतिशय उत्तम पद्धतीने विधिमंडळाची काळजी घेतलेली आहे. दालने तर अतिशय सुरेख केली आहेत, पण आपल्याकडे वाद घालण्यासाठी येणार्या अनेकांना आपण गरम कॉफी देऊन शांत करून पाठवलेले आहे. त्यांना मासे-जेवणही खाऊ घातले आहे. विषय समिती बैठकीचा दर्जा तर एवढा उंच ठेवला होता की, तुम्हीच अध्यक्ष म्हणून राहावे, असे आम्हाला वाटत होते. केवळ दालनेच नव्हे तर सगळेच व्यवस्थित करण्याचे काम आपण आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केले.
विशेष म्हणजे, राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीच्या संदर्भात दिलेल्या निवाड्याचेही जयंत पाटील यांनी कौतुक केले, ते म्हणाले की, मागील अडीच वर्षांत आपल्याला जास्त काळ कोर्ट म्हणून काम करावे लागले. अनेक गोष्टी कोर्ट म्हणून आपल्या समोर आल्या. आम्ही सगळयांनी बाजू मांडली. चौथ्या मजल्यावर बसून, न्यायदानाचे काम करतानाही तुम्ही आम्हाला उत्तम सहकार्य केले. आपल्या बोलण्यात, शरीरभाषेत कुठेही दुजाभाव दिसला नाही. उलट आमच्या साक्षीमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही मदत केली. फार संयमी असे काम तुम्ही केले. तुम्ही निकाल तर असा दिला की, अजून सुप्रीम कोर्टाला त्यावर निकाल देता आलेला नाही. एक सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस घरी गेले. त्यांनी या केसला हात लावला नाही. एका गोष्टीबद्दल तुमचे आभार मानायलाच हवेत की, तुम्ही कोणाला अपात्र ठरवले नाही. सुप्रीम कोर्ट आता निर्णयच देत नाही. त्यामुळे तुमचे आभार मान्य करून तुमचा निर्णय मान्य करीत आमचा नवा डाव सुरू झालेला आहे. हाच आमच्यासमोरचा पर्याय आहे. आपल्याला एक चांगले, कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत. येत्या पाच वर्षांत ते सभागृहाचे काम उत्तम चालवतील.
जयंत पाटील यांनी खोचकपणे का होईना देवेंद्र फडणवीस यांचीही वाखाणणी केली. ते म्हणाले की, फडणवीस पाच वर्षांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’असे म्हणाले होते. ते पुन्हा आले, पण दुसरीकडे बसले. मात्र, या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बदल झाले, हे त्यांच्या भाषणातून ऐकले. त्यांच्यात एक आमूलाग्र बदल झाला आहे. तो म्हणजे त्यांनी आताच्या आपल्या भाषणातून विरोधी पक्षासोबत संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मी त्याचे स्वागत करतो. कारण विरोधी पक्ष किती लहान आहे किंवा मोठा आहे, यापेक्षा जनतेला जे अपेक्षित आहे, ते मांडण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाशी संवाद साधण्याची अपेक्षा आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. आज ते पुन्हा ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत. त्यासाठी त्यांचेही अभिनंदन केलेच पाहिजे.
जयंत पाटील
गुड न्यूज देतील
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना अजित पवार यांना उद्देशून ’दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय’ असे वक्तव्य केले. त्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, जयंत पाटील म्हणाले, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत. यातील मधली ओळ अशी आहे की ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असतील. शरद पवार साहेबांचे आवडीचे गाणे आहे ’तुम इतना क्यू मुस्कुरा रहे हो’. त्यानुसार मै इतना मुस्करा रहा हू, दिल मे खुशी छुपा रहा हू। जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेत लवकरच गुड न्यूज देतील.