टोकियो – जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘सुशी’ या खाद्यपदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लु फिन टुना या माशाला खूप महत्व आहे. दरवर्षी जपानमध्ये समुद्रात पकडलेल्या अशा माशांचा लिलाव केला जातो. या लिलावात मोठ्या आकाराच्या टूनाला जास्तित जास्त किंमत मिळते.यावर्षी जपानची राजधानी टोकीयोमधील टोयुसु या नावजलेल्या मोठ्या फिश मार्केटमध्ये ५ जानेवारी रोजी हा लिलाव आयोजित केला होता. या लिलावात एका २७६ किलोच्या ब्लू फिन टूनाला १.३ मिलीयन डॉलर (जापनिज करन्सीमध्ये २०७ मिलियन येन ) म्हणचेज भारतीय रुपयात ११ कोटी १५ लाख इतकी भली मोठी किंमत मिळाली आहे.. सुशी गिन्झा ओन्डेरा ग्रुप या सुशी रेस्टॉरंन्ट चालवणाऱ्या कंपनीने या माशासाठी ही रक्कम मोजली आहे.
१९९९ पासून आतापर्यंतच्या झालेल्या या लिलावाच्या इतिहासातील ही दुसरी मोठी रक्कम आहे. यापूर्वी २०१९ मध्ये २७८ किलोच्या एका ब्लू फिन टूनाला ३३३.६ मिलीयन येन भारतीय रुपयात १८ कोटी १६ लाख इतकी मोठी रक्कम मिळाली होती. जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या या लिलावात अनेक मोठ्या कंपन्या भाग घेत असतात. कारण नवीन वर्षाच्या आरंभी मिळणार मासा हा ‘लकी’ असतो अशी तेथील सुशी रेस्टॉरंट मालकांची भावना असते.