अलिबाग- पांढर्या शुभ्र, चवीला गोड व औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या जगप्रसिद्ध पांढर्या कांद्याची सध्या लागवड सुरू झाली आहे. तालुक्यातील कार्ले,खंडाळे परिसरात शेतकरीवर्ग पांढऱ्या कांद्याची लागवड करताना दिसत आहे.यंदा सुमारे २७५ हेक्टर क्षेत्रावर हे कांद्याचे पीक मातीचे दांड करीत वाफे पद्धतीने घेतले जाणार आहे.
अलिकडेच अलिबागच्या या पांढर्या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन मिळाले आहे.या पांढरा कांद्याला पर्यटकांकडून मोठी पसंती असते.तालुक्यातील कार्ले, खंडाळे,नेहुली,वेश्वी,
वाडगाव अशा अनेक गावांतील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. दोन- अडिच महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल असते.ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळते.रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते.यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास गेल्या आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे.शेतकर्यांनी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड सुरू आहे