वैजापूर
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीला वाचवण्यासाठी शेजाऱ्याने जिवाची बाजी लावल्याची घटना वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे घडली.त्याने बिबट्याचा १०० फुटांपर्यंत पाठलाग केल्याने चिमुकली थोडक्यात बचावली.
तलवाडा गावालगत आयनार वस्ती असून येथील बालिका श्रुती नामदेव आयनर (६) ही नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे रविवारी सायंकाळी खेळत होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरडा ऐकू आल्याने कडू बोडखे, दिनकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता १०० फुटांपर्यंत पाठलाग करून मुलीला बिबट्याच्या तावडीतून वाचवले. मुलीच्या मानेवर, कानावर व गालावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपासून तलवाडा येथील वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी बल्हेगाव येथे बिबट्याने काही जनावरांचा फडशा पाडला होता.