चिपळूण- तालुक्यातील टेरव येथील जंगलात वनविभागाने पुन्हा एकदा कोळसा भट्ट्यांवर धाडी मारण्याची मोहीम फत्ते केली आहे.या कारवाईत ३० पोती कोळसा वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे.मात्र याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार येत होती.दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात.त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी याविरोधात आवाज उठविला होता.वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.निवेदन दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी ठाम होते.त्यानुसार वन विभागाने नोहेंबरमध्ये टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्ट्यांवर धाड टाकली होती. या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला होता तर टेरव येथील संतोष कदम, बाबुराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हे दाखल केला होता. तसेच त्यांच्याकडून ४७ घनमीटर लाकूड जप्त केले होते.त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा परिक्षेत्र वनाधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये ३० पोती कोळसा जप्त करण्यात आला आहे.