पणजी- गोवा राज्य सरकारच्या खाण खात्याने पुकारलेल्या ई-लिलावात कोडली खाणपट्टा जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीने जिंकला. या कंपनीने बोली भावापेक्षा ९२.६ टक्के जास्त बोली लावत हा खाणपट्टा आपल्या ताब्यात घेतला आहे.देशातील सर्वांत मोठी लोहखाण म्हणून कोडली खाण ओळखली जाते. यापूर्वी ती सेसा गोवा आणि नंतर वेदान्ताकडे होती.
राज्य सरकारने तीन खाणपट्ट्यांचा लिलाव पुकारला आहे. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र कंपन्यांना आर्थिक बोली लावण्यासाठी पात्र ठरविले जाते.काल या बोलीसाठी १० कंपन्या पात्र ठरल्या. या खाणपट्ट्यात ५.६ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याआधारे ही बोली लावण्यात आली.
राज्यातून केवळ वार्षिक २० दशलक्ष मेट्रिक टनच खनिज निर्यात केले जाऊ शकते. या खाणीत ०.५ दशलक्ष मेट्रिक टन साठवलेले खनिज आहे. राज्यात खाणकाम बंदीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खाणकाम पुन्हा सुरू झाले,तेव्हा कोडली खाणीतूनच खाणकामास पहिल्यांदा सुरुवात झाली होती.