गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ गोंदिया-कोहमारा मार्गावर आज दुपारी १ वाजता शिवशाही बस उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. यावेळी खजरी गावाजवळील वळणावर अचानक एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याला वाचवण्याच्या नादात शिवशाही बस वळणावर उलटली. ही बस रस्त्यावर फरफटत गेली. गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघातात बसमधील ११ प्रवाशांना मृत्यू झाला. या अपघातातमुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या अपघाताचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, मृतांना नातेवाईकांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.