मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध झुगारून माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना जवळ केल्याने महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो. मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे त्यांना सोबत घेऊ नका,असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी खुल्या पत्राद्वारे अजित पवार यांना केले होते. पण तेच नवाब मलिक काल अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला निमंत्रित आमदार म्हणून उपस्थित होते. ते अजित पवार यांच्या विधान परिषद उमेदवारासाठी मतदान करणार आहेत. हे एक मत विजयासाठी फार महत्वाचे आहे. त्यामुळे फडणवीस यांना न जुमानता मलिकांना अजित पवारांनी विरोध केला नाही.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर मोठा न्यायालयीन लढा झाला. त्यावेळी नवाब मलिक यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करून आपण अजित पवार गटासोबत असल्याचे सांगितले होते. पण अजित पवार गट जेव्हा तिसरा घटक पक्ष म्हणून फडणवीस -शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक महायुतीमध्ये नको होते. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापूर्वी फडणवीस यांनी अजित पवार यांना खुले पत्र लिहून ‘देशद्रोही’ मलिक यांना सोबत घेऊ नका, असे आवाहन केले होते. फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील मलिकांना सोबत घेऊ नका, असे अजित पवरांना सांगितले होते.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदचा हस्तक सलीम पटेल यांच्याशी संगनमत करून गोवावाला कंपाऊंडच्या जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्या प्रकरणात ते वर्षभराहून जास्त काळ तुरुंगात होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक जरी अजित पवार गटात गेले असले तरी आजारपणाचे कारण देत ते प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नव्हते.पण आता विधान परिषदेत दोन उमेदवार निवडून आणायचे असल्याने अजित पवार यांना प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने त्यांनी त्यांना निमंत्रण देऊन बैठकीला बोलावून घेतले. महत्त्वाचे म्हणजे एक वर्षापूर्वी देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत मलिक यांना विरोध करणारे फडणवीसही आता मूग गिळून गप्प बसले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणार्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विधान सभेतील संख्याबळानुसार महायुतीत सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपाला 5 जागा मिळणार आहेत.तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला प्रत्येकी दोन जागा मिळणार आहेत. अजित पवार गटाने शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर यांची नावे जाहीर केली आहेत.
फडणवीस गप्प का?
नवाब मलिक यांच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नवाब मलिक यांच्याबाबत आता फडणवीस का गप्प बसले आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. मलिक यांच्याहून गंभीर आरोप असलेले लोक शिंदे गटात आणि भाजपामध्ये आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला. विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक महायुतीसोबत आहे की नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.