डेहराडून- उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्रिस्टल हेलिकॉप्टर कोसळले. भारतीय दलाचे बिघाड झालेले क्रिस्टल एव्हिएशन हे हेलिकॉप्टर एमआय-१७ या हेलिकॉप्टरला टोईग चेनच्या सहाय्याने गौचर धावपट्टीवर नेण्यात येत होते. मात्र, थोड्या अंतरावर जाताच क्रिस्टल हेलिकॉप्टरच्या वजनामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे एमआय-१७ हेलिकॉप्टरचा तोल अनियंत्रित होऊ लागला, यानंतर काही सेकंदात क्रिस्टल हेलिकॉप्टर हवेत हेलकावे खात थारू कॅम्पजवळ आल्यावर लिंचोली येथील मंदाकिनी नदीत कोसळले. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी किंवा उपकरणे नव्हती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण पडलेल्या हेलिकॉप्टरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
क्रिस्टल हेलिकॉप्टर याआधी केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सेवा देत होते. या वर्षी यात्रेच्या सुरुवातीला २४ मे रोजी केदारनाथ धाम येथे क्रिस्टल हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, यावेळी प्रवासी या हेलिकॉप्टरमधून केदारनाथ दर्शनासाठी जात होते. पण, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.