केजरीवालांना अंतरिम जामीन मात्र जेलमधून सुटका नाहीच

नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेसंबंधी आहे. मात्र केजरीवाल यांना सीबीआयनेही अटक केली असल्याने जामीन मिळाल्यावरही त्यांची तिहार जेलमधून तूर्त सुटका होणार नाही.
ईडीने केजरीवाल यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर 17 मे रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देताना केजरीवाल यांनी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम 19 मधील ‘अटकेची आवश्यकता’ या निकषावर गंभीर कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. या मुद्यांवर मोठ्या खंडपीठासमोर सखोल विश्‍लेषण होणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रकरण तीन जजच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येत आहे. मोठ्या खंडपीठात सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करीत आहोत.
दरम्यान, मद्य घोटाळ्याशी संबंधित दुसर्‍या प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर केजरीवाल यांनी जामीनासाठी केलेला अर्ज प्रलंबित आहे. यावर 17 जुलै रोजी सुनावणी आहे. त्यातही जामीन मिळाला तर केजरीवाल जेलमधून मुक्त होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top