नवी दिल्ली- केंद्र सरकार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवाशी खेळत असून त्यांना नाहक त्रास देत आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी केला आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय सिंग यावेळी म्हणाले की, भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला केवळ केजरीवाल यांना केवळ त्रास द्यायचा नसून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट व्हावे असाही त्यांचा विचार आहे. केजरीवाल यांना कारागृहात असतांना काही गंभीर आजार होईल अशी मोदी सरकार वाट बघत आहे .अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे वजन साडेआठ किलो घटले आहे. वैद्यकीय दृष्टीने कोणत्याही कारणाशिवाय अशा पद्धतीने वजन कमी होणे हे धोक्याचे आहे. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही अचानक कमी होत असते. गेल्या काही दिवसांमध्ये पाच वेळा त्यांची साखरेची पातळी ५० पेक्षा कमी झाली होती. अशा प्रकारे काहीही कारणाशिवाय जर साखरेची पातळी कमी होत असेल तर त्यातून रुग्ण कोमात जाण्याचा धोका असतो. केजरीवालांना केंद्र सरकारने अशा स्थितीतही कारागृहात ठेवले आहे. कारागृहात काही झाले तर त्यांना तातडीने मदत मिळणेही अशक्य आहे. केजरीवालांच्या जीवाशी खेळण्याचे हे भाजपाचे षडयंत्र आहे. यामुळे केजरीवाल यांच्या कुटुंबाला, आम्हाला व देशातील त्यांच्या असंख्य समर्थकांना त्यांची चिंता आहे.