मुंबई – रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
अविरत रुग्णसेवेची शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सव निमित्त व्यक्त केली.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते.