नवी दिल्ली – स्वच्छता मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता मिशन अंतर्गत आज जे काही चालले आहे, ते आधी का झाले नाही? महात्मा गांधींनी मार्ग दाखवला होता. राजकारण्यांनी गांधींजींच्या नावाने मते गोळा केली, पण त्यांचा संदेश विसरले असा पूर्वीच्या सरकारांना त्यांनी टोला लगावला.
गांधी जयंती निमित देशवासियांशी संवाद साधताना ते म्हणाले घाण निर्माण करणे हा आपला हक्क मानणारा खूप मोठा वर्ग होता. कोणी स्वच्छता केली तर त्यांच्या इज्जतीला धक्का बसेल. आम्ही सगळे साफसफाई करू लागलो तेव्हा त्यांना वाटले की मी जे करतो तेही मोठे काम आहे. आता बरेच लोक माझ्याशी जोडले जात आहेत. स्वच्छ भारत अभियानाने प्रचंड मानसिक बदल घडवून आणला आणि सफाई कामगारांना सन्मान मिळाला .
गेल्या १० वर्षांत करोडो भारतीयांनी स्वच्छ भारत मिशन स्वीकारले आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती यांनीही स्वच्छता सेवा केली आहे. १५ दिवसांच्या सेवा पंधरवाड्यात २ कोटी लोकांनी सहभाग घेतला. आजपासून हजार वर्षांनंतर जेव्हा २१व्या शतकातील भारताचा अभ्यास केला जाईल तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण नक्कीच होईल असेही त्यांनी सांगितले.