शिर्डी – खासदार व भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असे टीकास्त्र काँग्रेस पक्षावर डागले. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभेला भोकर मतदार संघातून विजयी झाल्या. मुलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी आज प्रथमच शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अशोक चव्हाण म्हणाले की,काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था कशी झाली? मी राज्याचे नेतृत्व करत होतो, तेव्हा ८२ जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने ४२ जागा जिंकल्या. आता नाना पटोले यांनी १६ जागा निवडून आणल्या. त्यामुळे याबाबतचे आकलन काँग्रेस नेत्यांनी केले पाहिजे. ईव्हीएमवर खापर फोडत विरोधकांनी आताच रडीचा डाव सुरू केला आहे. २०२९ मध्येही ते निवडून येणार नाहीत.
भाजपा प्रवेशाबद्दल ते म्हणाले की, शेवटी मी ही मनुष्य आहे. मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी चौदा वर्षे वनवास भोगला. कोणा विषयी राग नाही. मी साईबाबांचा भक्त असल्याने कोणावरही विनाकारण टीका करत नाही. परंतु मला भावना आहेत. त्यामुळे रागाच्या भरात काही बोललो असेल. त्यामुळे त्यांनी मनावर न घेता राजकारणात हार जीत होत असते, हे लक्षात ठेवावे.