कराड – कराड तालुक्यात बिबट्याने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील काले परिसरात तर बिबट्या नदीकाठी असलेल्या तसेच डोंगराकडेला असलेल्या गावात घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. रविवारी रात्री काले गावातील संभाजी यादव यांच्या गोठ्यात असलेल्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला.
संभाजी यादव यांच्या गोठ्यामध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी बिबट्याने गोठ्यात असलेल्या कुत्र्यांवर हल्ला करत एका कुत्र्याला उचलून पळूवून नेले. या बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. मागील महिन्यात १३ डिसेंबर रोजी कराड-चांदोली मार्गावरील घोगावमध्ये मोकळ्या शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून बिबट्याने १३ मेंढ्यांचा फडशा पाडला. एका शेतकऱ्याने पाटील मळी नावाच्या शिवारात मेंढ्या बसवल्या होत्या. सातारा जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. महाबळेश्वर-आंबेनळी घाटात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.