नांदेड- शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र मागील आठ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस)चे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे पुरवठा कार्यालयाचे ऑफिस लॉगिन, पब्लिक लॉगिन बंद असून, शिधापत्रिकांचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. याचा नागरिकांना मनस्ताप होत असून, तहसील कार्यालयांमध्ये अनेकदा हेलपाटे करावे लागत आहेत.
आरसीएमएस ही पुरवठा विभागाची वेबसाइट असून, यावर शिधापत्रिकासंबंधीचे महत्त्वाचे कामकाज केले जाते. नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी करणे, नाव वाढवणे, उत्पन्नाचे निकष, बारा अंकी नंबर मिळवणे ही सगळी कामे ऑनलाइन स्वरूपात केली जातात. मात्र मागील दोन महिन्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाइन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत. तर संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कामकाज करताना अडचणी निर्माण येत आहेत.