जळगाव – ईव्हीएमवर मतदान घेण्याच्या विरोधात जळगावमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे संशयास्पद असून आमचा त्यावर आक्षेप आहे. मतदान ईव्हीएम यंत्रावर झाल्याने निकाल विपरित लागला आहे. आम्ही त्याबाबत निषेध व्यक्त करतो,असे निवेदनात म्हटले आहे.
मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएमवर हरकत घेतल्यानंतर व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार देत मतमोजणी चालू ठेवली. हे सुध्दा संशयास्पद आहे.त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जो काही गैरप्रकार झाला त्याची चौकशी व्हावी व मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.