गाझा – इस्रायलने काल सलग चौथ्या दिवशी हमासच्या दक्षिण गाझामधील पॅलेस्टिनी भूभागावर हवाई हल्ला केला. यात २९ पॅलेस्टिनी जागीच ठार झाले. तर १२ लोक जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हा हल्ला दक्षिणेकडील खान युनिस शहराजवळील अबासन येथील अल-अवदा शाळेच्या गेटवर झाला. याबाबत हमास संचालित प्रदेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले की या हल्ल्यांमध्ये २९ लोक मारले गेले. यापूर्वी हमासवर झालेल्या तीन हवाई हल्ल्यांची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली होती. या तिन्ही हल्ल्यांमध्ये शाळेत लपलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले होते. दुसरीकडे हमासने मात्र इस्रायलच्या या दाव्याचे खंडन केले आहे. शाळेत फक्त निर्वासित लोक असून कोणतेही दहशतवादी लपले नसल्याचे हमासने सांगितले.