बीड- बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या जोरदार चर्चेत असताना वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त होत असलेल्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महादेव मुंडे यांची हत्या होऊन चौदा महिने उलटून गेले तरी या गुन्ह्याचा तपास तसूभरही पुढे सरकलेला नाही. कुणालाही अटक झाली नाही. आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात हजारो चकरा मारून आणि नेतेमंडळींच्या हातापाया पडून थकलेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नीने आज प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली कैफियत मांडली. याप्रसंगी बोलताना भावूक होत आम्हाला न्याय कधी मिळणार, असा आर्त सवाल त्यांनी केला.
महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोरच हत्या झाली.या हत्येमध्ये वाल्मिक कराडशी संबंधित लोक सामील असल्याची चर्चा सुरुवातीपासून होत आहे. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव होता. खोट्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा असा दबाव कराड आणत होता. त्यामुळे तत्कालीन तपास अधिकारी निकम यांनी स्वतःची परळीतून अन्यत्र बदली करून घेतली. काल भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले. धस यांनी महादेव मुंडे प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या मुलाबरोबर असलेला एक व्हिडिओ माध्यमांना दाखवला. त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले.
या पार्श्वभूमीवर महादेव मुंडे यांच्या पत्नीने आज माध्यमांसमोर आपली कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या की हत्या झाली त्या दिवशी शनिवार होता. माझ्या पतीचा उपवास होता. सायंकाळीॅ ते प्रणव आणि प्रविण या मुलांना घरी सोडून बाहेर निघून गेले. त्यादिवशी त्यांना उपवास सोडून जेवायचे होते. म्हणून मी त्यांची वाट बघत बसले. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे मला वाटले की ते तुळजापूरला काही कामासाठी जाणार होते तिथे गेले असतील. रात्री तीन वाजेपर्यंत ते जेव्हा घरी परतले नाहीत त्यामुळे मी घरातील सीसीटिव्ही कॅमेरे चालू करून शोध घेतला. पहाटे पाच वाजेपर्यंत थांबून मी माझ्या घरात तळमजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूना माझ्या वडिलांना फोन करायला सांगितले. तेव्हा माझ्याशी माझी वहिनी बोलली. माझ्या भावाला काही वेळापूर्वी पोलिसांचा फोन आला होता त्यामुळे तो पोलीस ठाण्यात गेला आहे,असे तिने सांगितले. त्यामुळे मी घाबरून गेले. माझा भाऊ मला माझ्या घरी आला. त्याने दाजी (महादेव मुंडे) घरी आहेत का असे विचारले, मी नाही म्हणून सांगताच तो काहीही न बोलता निघून गेला. सकाळी साडेदहा वाजता माझ्या पतीची हत्या झाल्याची माहिती मला देण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत मी पोलीस ठाण्य़ात शेकडो चकरा मारल्या. पण काहीही झाले झाले नाही.औरंगाबादला जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. नवीन पोलीस उप अधीक्षक नवनित कॉवत यांच्याकडेही तक्रार केली. एवढे सर्व करून आम्हाला न्याय मिळालेला नाही. आता आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे मला आशेचा किरण दिसू लागला आहे,अशी हकिगत महादेव मुंडेंच्या पत्नीने मांडली.