मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी २०१८ च्या भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी दलित हक्क कार्यकर्ते प्रा.आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवित ही सुनावणी दुसर्या खंडपीठापुढे घेण्याचे निर्देश दिले.
तेलतुंबडे यांनी मुक्ततेची याचिका फेटाळल्याला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तेलतुंबडे यांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.यावेळी न्यायाधीशांनी स्पष्ट केले की,या प्रकरणाशी संबंधित आपण काही जामीन अर्जांवर यापूर्वी निर्णय दिला आहे.त्यामुळे तेलतुंबडे यांच्या वकिलांना आता याचिकेवर सुनावणीसाठी दुसऱ्या खंडपीठाकडे जावे लागेल. तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करावा, अशी मागणी करणारी ही याचिका आहे.या प्रकरणात १५ आरोपी आहेत.
तुषार दामुगडे या फिर्यादीवरून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे तेलतुंबडेना इतर आरोपींसह अटक करण्यात आली होती. दामुगडे यांच्या तक्रारीनुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,ज्यामध्ये कबीर कला मंचचे वक्ते, गायक आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी काही प्रक्षोभक भाषणे करण्यात आल्याने त्याचा जातीय तेढ निर्माण झाली.या वक्त्यांमध्ये आनंद तेलतुंबडे यांचा समावेश होता.