नवी दिल्ली – भारताच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी बजावली असल्याच्या भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केल्या आहेत. त्या काल भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे आहे. देशाच्या साधनसामुग्रीच्या विकासात व निसर्गाच्या संवर्धनाचे कार्य हा समाज करत आलेला आहे. सध्याच्या सरकारने आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या असून त्यांना मुळ प्रवाहाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या विकासात आदिवासी महिलांचे योगदानही महत्त्वाचे आहे. आदिवासी विकसित झाल्यास देशाचा विकास होईल. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत काल जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीशांबरोबर लढणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.