१५० कोटींच्या निधीला
राज्य सरकारची मान्यता
मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.
मुंबईतील ६६ इमारती ३० वर्षे जुन्या असून सध्या या इमारतींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे रहिवाशांना त्यांच्या इमारतींची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करता येत नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे. इमारतींची दुरुस्ती, पुनर्विकासासाठी गृहनिर्माण विभागाकडे कोणतीही योजना उपलब्ध नाही. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. या जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केली होती. अखेर पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत या इमारतींच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून देण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. याबाबतचा सरकारी आदेशही जारी करण्यात आला आहे. या इमारतींमध्ये ‘ए’ विभागातील विजयदीप व ‘सी’ विभागातील समता,सागर व परिक्षम या चार इमारतींचा समावेश आहे.