कर्जत – पावसाळ्यात विश्रांतीला गेलेली माथेरानची राणी म्हणजेच नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर उद्या ६ नोव्हेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. काल सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबतचे पत्रक जारी केले.
आतपर्यंत पावसाळ्यात बंद होणारी माथेरान मिनी ट्रेन दसऱ्याला सुरू व्हायची. मात्र,यंदा दसरा आणि दिवाळी संपली तरी ही ट्रेन सुरू झालेली नव्हती.त्यामुळे पर्यटक नाराज झाले होते. मात्र आता त्यांची ही नाराजी दूर होणार आहे. मिनी ट्रेन नेरळ- माथेरान- नेरळ मार्गावर सुरू करण्यासाठी इंजिन होते,
पण प्रवासी वर्गाचे डबे नव्हते.देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रवासी वर्गाचे डबे दर दोन वर्षांनी कुर्डुवाडीला पाठवले जातात.यंदा हे डबे नेरळ येथे परत येण्यास उशिर झाला होता.त्यामुळे माथेरान मिनी ट्रेन सुरू करता आली नव्हती.मात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात माथेरानच्या राणीची शीळ उद्यापासून पुन्हा घुमण्यास सुरुवात होणार आहे.