मुंबई – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर उद्या अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळणार आहे. उद्या भाजपाच्या आमदारांची मुंबईत बैठक असून, या बैठकीत नेत्याची निवड होईल. या बैठकीसाठी आज सायंकाळी भाजपाचे दोनकेंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी मुंबईत दाखल झाले. मात्र मुख्यमंत्री निश्चित होणार असला तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कोणती खाती मिळणार याबाबत अद्याप काहीही कळलेले नाही. आज संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी शिंदे यांना भेटायला गेले. तेथे दोघांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत दोघांव्यतिरिक्त तिसरे कुणीच नव्हते. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे कळले नाही.
दिल्लीत फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्यात अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये कुठलीही बैठक झालेली नाही. आज 5 दिवसांनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यात भेट झाली. ही भेट झाल्यावर फडणवीस मीडियाशी न बोलताच निघून गेले. या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, या भेटीवेळी आम्ही सगळे वर्षावर उपस्थित होतो. परंतु भेट केवळ शिंदे आणि फडणवीस यांच्यातच झाली. त्यांच्या व्यतिरिक्त तिसरे कुणीच भेटीत उपस्थित नव्हते. त्यामुळे भेटीत नेमकी कसली चर्चा झाली हे आम्हाला ठाऊक नाही.
काल रात्री फडणवीस यांचे खास सहाय्यक गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी प्रकृतीची विचारपूस करायला आलो आहे इतकेच सांगितले. त्यानंतर रुग्णालयात तपासणी करून एकनाथ शिंदे मुंबईत वर्षा बंगल्यावर दाखल झाले आणि त्यांनी बैठकींचा सपाटा सुरू केला. त्यांच्या गटाचे आमदारही त्यांच्या भेटीसाठी आले. सायंकाळी गिरीश महाजन हे पुन्हा वर्षा बंगल्यावर नवीन निरोप घेऊन दाखल झाले होते. त्यानंतरच फडणवीस वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या भेटीसाठी आले.
दिल्लीला गेलेले अजित पवार यांची काल कुणाशीही अधिकृत भेट झालेली नाही. आज दिल्लीत पोहोचलेले सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आणि अजित पवार हे अमित शहा यांना भेटले अशा बातम्या उगाच पसरवू नका, असे त्यांनी पत्रकारांनाच खडसावले.
आज दिवसभर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार, नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांची सतत ये-जा सुरू होती. 5 डिसेंबरला होणार्या शपथविधी कार्यक्रमाची तयारी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपा नेत्यांची मुंबईत बैठक घेतली आणि शपथविधीच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर महायुती भक्कम असून, आपल्यात कोणताही वाद नाही हे दाखविण्यासाठी महायुतीचे नेते आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी गेले. यात चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांचाही समावेश होता. आझाद मैदानावर सध्या केवळ भाजपाचे झेंडे लागले आहेत असे काहींनी म्हटल्यावर आमची एकत्रित तयारी सुरू आहे असे उत्तर मिळाले.
उद्या भाजपा आमदारांची बैठक होऊन नेत्यांची निवड होणार आहे. अजूनही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार की, ते दिल्लीत जाऊन केंद्रातील एखादा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार या प्रश्नाला खात्रीशीर उत्तर मिळालेले नाही. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील की, आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला उपमुख्यमंत्रिपद देतील. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील की, सत्तेबाहेर राहून पक्ष सांभाळतील, एकनाथ शिंदे यांना गृहखाते मिळेल की नाही हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहे. या सर्व घडामोडीत फक्त अजित पवार यांचे स्थान निश्चित आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीच राहतील आणि त्यांना मागील मंत्रिमंडळातील खातीच मिळतील हे निश्चित असल्याने या तीन नेत्यांपैकी अजित पवार हेच सध्या सर्वाधिक आरामात दिसत आहेत.