हैद्राबाद – ‘सुर्यवंशम’ या हिंदी चित्रपटात गाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या हिचा २२ वर्षांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून अभिनेते मोहनबाबू यांनी संपत्तीच्या वादातून तिची केलेली हत्या आहे अशी तक्रार आता २२ वर्षांनंतर करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते चिट्टीमल्लू यांनी खम्मन जिल्ह्यात ही तक्रार केली असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस संचालकांनाही पत्र लिहिले आहे.दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सौंदर्या हिचा १७ एप्रिल २००४ रोजी एका खाजगी विमानाच्या अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल तब्बल २२ वर्षानंतर चिट्टीमल्लू यांनी तक्रार करीत म्हटले की, शमशाबाद जिल्ह्यातील जलपल्ली येथील एक सहा एकर जमीन मिळवण्यासाठी मोहनबाबूंनी सौंदर्यावर दबाव टाकला होता. सौंदर्या व तिच्या भावाने ही जमीन मोहनबाबूंना विकण्यास नकार दिला. त्यामुळेच त्यांनी तिची हत्या केली व तिच्या मृत्यूनंतर मोहनबाबू यांनी ही जमीन बळकावली. मोहनबाबूंमुळे सध्या मंचू मनोज हा व्यक्तीही अडचणीत आला असून त्याचीही मालमत्ता बळकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांनाही न्याय देण्यात यावा. मोहनबाबूंकडून आपल्या जीवाला धोका आहे. सरकारने ही जमीन ताब्यात घेऊन तिचा वापर एखाद्या सामाजिक कार्यासाठी करावा.
अभिनेत्री सौंदर्याचा अपघात नव्हे घात २२ वर्षानंतर मोहनबाबू विरोधात तक्रार
