अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत? आधी पत्नीला संधी! आता पुत्र जय पवारला आमदारकी हवी


पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता, कुटुंबाच्या दृष्टीने ते योग्य नव्हते असे आज सकाळी 7 वाजता दिलेल्या मुलाखतीत म्हणणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आजच बारामतीतून आपला पुत्र जय पवार याला पुतण्या युगेंद्र पवार यांच्या विरोधात विधानसभेला उभे करणार असल्याचे सूतोवाच केले. इतकेच नव्हे तर आता पुत्रासाठी आपण बारामतीतून निवडणूक लढवणार नाही असेही स्पष्ट केले. आधी पत्नी सुनेत्रा यांना लोकसभेचे तिकीट दिले, त्यांचा पराभव झाल्यावर त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून खासदार बनवल्यावर अजित पवार आता आपल्या मुलाला आमदार करण्याच्या मागे लागले आहेत हे उघड झाल्याने खळबळ माजली आहे.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव झाल्यानंतर अजित पवार आता बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार का, असेही विचारले जात होते. आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवारना संधी देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका लढलो आहे त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. जनता, कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल. त्यावर पक्षाचे संसदीय मंडळ म्हणजे दादाच हे उघड असल्याने कुटुंबात राजकारण आणायला नको होते असे म्हणणारे अजित पवार आपल्या मुलासाठी पुन्हा कुटुंबात राजकारण आणण्याच्या तयारीत आहेत हे उघड आहे.
अजित पवार यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा पार्थ याने पक्षात विरोध असताना 2019 मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याचा दारुण पराभव झाला. जय हा सध्या बारामतीतील समाजकारणात सक्रिय झाला आहे. लोकसभेवेळी एका दिवसात बारामतीत 11 राष्ट्रवादी युवा शाखांचे उद्घाटन त्याने केले होते. मात्र, यापूर्वी तो कधीही राजकीय व्यासपीठावर दिसला नाही. सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारात जय पवार होता. त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरागे-पाटील यांचीदेखील भेट घेतली होती. त्याला अनुभव नाही आणि त्याचे कार्यही नाही, तरीही त्याला तिकीट दिले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याने शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातही तो उतरला होता. लोकसभेच्या निकालानंतर तो अधिक जोमाने कामाला लागला आणि मतदारसंघ पिंजून काढू लागला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती विधानसभा मतदारसंघात त्याला तिकीट मिळणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही जय पवारला मैदानात उतरवण्याचे संकेत दिल्याने बारामतीतील आगामी निवडणुकीत युगेंद्र विरुद्ध जय असा पवार कुटुंबातील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
बारामती मतदारसंघ आपल्या मुलाला सोडल्यास अजित पवार कर्जत – जामखेड मतदारसंघातून लढतील, अशी चर्चा आहे. त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, असे म्हटले आहे. ते इतर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढू शकतात. किंबहुना कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा डाव खेळण्यासाठीच अजित पवार जयला बारामती मतदारसंघात उतरवू इच्छित आहेत, असेही म्हटले जात आहे.
सध्या अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनीही अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता बोलून दाखवली आहे.रोहित पवार आज म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी दादांवर दिल्लीहून दबाब टाकला जात आहे. त्यातून माझ्या मतदारसंघात माझ्याविरोधात पवार कुटुंबातील उमेदवार दिला जाऊ शकतो.
जयला बारामती मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत. त्यांनी जयबाबत भावना व्यक्त केल्या. आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा करू. जय पवारबाबत त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी त्या अनुषंगाने उत्तर दिले. परंतु त्यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या पक्षाला यश कसे मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. सेनापतीच्या नेतृत्वात आपण निवडणुका लढवत असतो, तेव्हा सेनापती निवडणुकीच्या रिंगणात असतोच, यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही. भाजपाचे चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या भविष्यातील नियोजनाविषयी माहिती नाही. विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार हे यात्रा काढत आहेत. विधानसभेसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र लोकसभेच्या निकालातून त्यांनी काही गणित मांडले असेल तर ते मला माहीत नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून अजित पवार यांना टोला हाणला. ते म्हणाले की, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र संसदीय मंडळ म्हणजे कोण? तर अजित पवार. शरद पवार यांच्या पक्षाचे आणखी एक पदाधिकारी महेबूब शेख म्हणाले की, बारामतीतील जनतेची आता एक इच्छा आहे. दादा नवा ही बारामतीकरांची इच्छा आहे. मात्र, तो दादा कोण? हा प्रश्न आहे. शरदचंद्र पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर असेल, तोच दादा हवा, असे नागरिकांचे मत आहे. शरद पवार गटाचेच अंकुश काकडे यांनी म्हटले की, अजित पवार सहजासहजी बाजूला होणार नाहीत, तेच बारामतीतून लढतील . तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले की, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.

पुलवामामुळे जनमत बदलले

अजित पवार यांनी हिंदीत दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, घटना बदलणार असे पसरविण्यात आले. त्यात 273 चा आकडा बहुमताला पुरेसा असताना भाजपाने 300 ऐवजी ’400 पार’ हा नारा दिला. इतके प्रचंड बहुमत हे घटना बदलासाठीच हवे आहे असे जनतेला वाटले, त्यात नागरिकत्व कायदा आणून काहींना देशाबाहेर काढतील आणि हिंदू राष्ट्र येईल ही भीती पसरली. नागरिकत्व कायद्याची चर्चा 2019 सालीही होती. पण तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. त्यावेळी पुलवामाची घटना घडली. पुलवामाच्या आधी जनमत वेगळे होते. पुलवामानंतर देश बचावासाठी जनता एकत्र आल्याने जनमत बदलले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top