बारामती- बारामतीतील अंजनगावच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत मंजूर झालेल्या वीज उपकेंद्राचे आज उद्घाटन झाले. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे या कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. दरम्यान याच कार्यक्रमावरून सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र संध्याकाळी त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. परंतु दोघांमध्ये बोलणे झाले नाही.दोघांनी एकमेकापासून काहीसे अंतरच ठेवले.
निवडणूक झाल्यानंतर एका प्रशासकीय बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेले अजित पवार व सुप्रिया सुळे आजवर एका व्यासपीठावर दिसले नव्हते. मात्र तालुक्यातील अंजनगावच्या या कार्यक्रमात दोघे एका कार्यक्रमात आले. दरम्यान कार्यक्रमाची पूर्व नियोजित वेळ ही संध्याकाळी चार वाजताची होती. त्यामुळे वेळेत पोहोचलेल्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत प्रतीक्षा केली. या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी या उपकेंद्राचे उद्घाटन केले.