नवी दिल्ली – महाराष्ट्रानंतर संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. दिल्लीतील 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज ही घोषणा केली. या निवडणुकीत आप आणि भाजपासह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपतो आहे. 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा 6 जानेवारीला झाली होती. यंदा ही निवडणूक काहीशी उशिरा म्हणजे 5 फेब्रुवारीला होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 17 जानेवारी असून, 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्जाची छाननी 28 जानेवारीपर्यंत होईल. निवडणूक आयोगाने कालच निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर दुसर्याच दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 नोंदणीकृत मतदार असून, त्यात 83.49 लाख पुरुष, तर 71.52 महिला मतदार आहेत. 25.89 लाख तरुण मतदार असून, 2.08 लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत.
दिल्लीत तिरंगी लढत
दिल्लीत आप, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना होणार आहे. आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात वितृष्ट आले आहे. गेली दहा वर्षे दिल्लीत आपची सत्ता आहे. यावेळी भाजपाला कुठल्याही परिस्थितीत दिल्ली काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावे लागल्यापासून भाजपा त्यांच्यावर चौफेर हल्ले करत आहे. तर तिसर्यांदा दिल्लीची सत्ता मिळवणारच असा चंग भाजपाने बांधला आहे. आपने याआधीच सर्व 70 उमेदवार जाहीर केले आहेत.
ईव्हीएमचे आरोप फेटाळले
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएममधील छेडछाड आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, मतदार यादीतून नावे वगळताना किंवा त्यात भर घालताना योग्य ती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली. यात कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्याला वाव नाही. या प्रक्रियेत मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान केंद्र, फॉर्म 17-सी आणि मतमोजणी केंद्र अशा सुमारे 70 पायर्या आहेत. मतदार याद्या तयार करताना नियमित बैठका घेतल्या जातात. फॉर्म 6 शिवाय त्या तयार केल्या जात नाहीत. ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोपही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी खोडून काढला. ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये कोणताही घोटाळा शक्य नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग आणण्याचा प्रश्नच नाही. ईव्हीएममध्ये अवैध मतेही टाकली जाऊ शकत नाही. ईव्हीएम हे टॅम्परप्रूफ, फुलप्रूफ साधन आहे. छेडछाडीचे आरोप निराधार आहेत. मतदानाच्या चार-आठ दिवस आधी मतदानयंत्रे सुरू केली जातात. त्यात चिन्हे, नवी बॅटरी टाकली जाते. हे सगळे एजंटसमोर केले जाते. त्यानंतर ईव्हीएम सील करून स्ट्राँगरूममध्ये ठेवली जातात. त्यांचे सील नंतर मतदानाच्या दिवशीच तोडले जाते. मतदान केंद्रावर प्रथम क्रमांक तपासले जातात. नंतरच ते सुरू केले जाते. संध्याकाळी मतदान संपल्यावर फॉर्म 17-सी दिला जातो. मतांची आकडेवारी जुळवली जाते. त्यानंतरच मतदान यंत्र सील केली जातात आणि स्ट्राँग रूममध्ये नेली जातात. मतमोजणीच्या वेळी त्यांचे सील पुन्हा उघडले जाते. तिथे फॉर्म 17-सी मधील आकडेवारी जुळवली जाते. त्यानंतरच मोजणी केली जाते. 5 व्हीव्हीपॅट मतांचीही मोजणी केली जाते. ईव्हीएमला न्यायालयात अनेकदा आव्हान देण्यात आले आहे. परंतु ते हॅक होऊ शकत नाही, असे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2019 नंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 व्हीव्हीपॅट मोजण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 67 हजार व्हीव्हीपॅटमधील साडेचार कोटी मतांची मोजणी झाली. त्यात एकाही मताचा फेरफार नव्हता. न्यायालयानेही हे आरोप फेटाळले आहेत.
महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना राजीव कुमार म्हणाले की, पाच वाजता मतदान संपल्यावर जे मतदार रांगेत उभे असतात त्यांना रात्री साडेअकरा, बारापर्यंत मतदान करायला दिले जाते. पाच वाजेपर्यंतची आकडेवारी हा केवळ ट्रेंड असतो. पाच वाजता मतदान संपल्यावर लगेच आकडेवारी देणे कुणालाही शक्य नाही. सगळी प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागतो. फॉर्म 17-सी देखील रात्री हळूहळू अपडेट होतो. दुसर्या दिवशी आम्ही छाननी करतो. निरीक्षक आणि उमेदवारांना बोलावतो. त्यानंतर नवी टक्केवारी जाहीर केली जाते.