अहमदाबाद – दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेत ८ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज अहमदाबाद येथील एका शाळेत तशीच घटना घडली. अहमदाबादच्या एका खासगी शाळेत गार्गी रानपारा नावाच्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहमदाबाद येथील थलतेज भागातील एका खासगी शाळेत गार्गी रानपारा नावाची विद्यार्थिनी सकाळी शाळेत आली. शाळेच्या इमारतीच्या पायऱ्या चढत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर ती तिथल्या बाकड्यावर बसली. काही सेकंदात ती जमिनीवर कोसळली. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मुलीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.
गार्गीचे आई-वडील मुंबईत राहतात. ती अहमदाबादमध्ये आजी-आजोबांसोबत राहत होती. घटनेनंतर पोलिसांनी शाळेत पोहोचून सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेचीही चौकशी केली आहे. गार्गी पूर्णपणे निरोगी होती.