चंद्रपूर- ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून जीपीएस टॅग लावून सोडण्यात आलेल्या ‘एन-११’ या मादी गिधाडाने चक्क पाच राज्यांतून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले होते . मात्र याच गिधाडाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील थिरुमयम रेंजजवळ विजेची तार ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना विजेचा धक्का लागून या गिधाडाचा मृत्यू झाल्याचे बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. थिरुमयम रेंजच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मृत गिधाडाला ताब्यात घेतले आणि सहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकाने उत्तरीय तपासणी केली. त्याचा अहवाल लवकर दिला जाईल, असेही सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक,
आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून या गिधाडाने प्रवास केला होता.