नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांत मुबलक प्रमाणात जलसाठा झाला आहे, त्यामुळे २५ सप्टेंबरपासून नंदुरबार शहराला आता दोन दिवसांऐवजी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे,अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
मंत्री विजयकुमार गावित म्हणाले की,गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे आजतागायत
आठवड्यातून २ दिवस नंदुरबार नगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरू होता. परंतु आता समाधानकारक पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाला आहे.या जलसाठ्यात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे नंदुरबार शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश नंदुरबार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते.मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाच्या तांत्रिक बिघाडामुळे ते शक्य होत नव्हते.पण आता ती अडचण दूर झाल्याने येत्या २५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे आदेश नगरपालिकेने काढले आहेत.