मुंबई- विद्यावेतनामध्ये १० हजारांची वाढ करावी आणि महागाई भत्ता व वसतिगृह निवास आदी मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चारही रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.येत्या २२ जुलैपर्यंत या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या संपकाळात पालिका रुग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
या निवासी डॉक्टरांनी आतापर्यंत अनेकदा आपल्या मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. त्यांच्या विद्यावेतनात १० हजार रूपयांची वाढ करावी असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. नाश्ता भत्ता,नवीन निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा अशा इतर विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, यासाठी या डॉक्टरांनी हा सामूहिक रजा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.