नवी दिल्ली – भारताला खरी स्वातंत्र्यप्राप्ती १९४७ ला झाली नाही. हे विधान देशद्रोही असल्याचा हल्लाबोल लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. आज दिल्लीतील इंदिरा भवन या नवीन पक्ष मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य कॉंग्रेस नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राहुल गांधी व खर्गे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर जोरदार टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, सरसंघचालक भागवत यांनी विधान केले की, भारताला खरे स्वातंत्र्य १९४७ मध्ये नाही, तर राम मंदिराच्या निर्मितीनंतर मिळाले. संविधान हे स्वातंत्र्यप्राप्तीचे फळ नाही. अशी विधाने,म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. भागवत यांना दोन- तीन दिवसांनी स्वातंत्र्य चळवळीबद्दलचे आणि संविधानसंदर्भातील त्यांचे मत देशाला सांगायचे असते. खरे तर त्यांचे विधान देशद्रोहासमान आहे. कारण ते त्यातून संविधान आणि ब्रिटिशांविरुद्धची लढाई अवैध असल्याचे नमूद करतात. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या देशात त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात खटला चालवला असता. आता आपण अशी मूर्खपणाची विधाने ऐकणे थांबवले पाहिजे. ‘देशात काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणताही पक्ष भाजपा आणि संघाचा अजेंडा थांबवू शकत नाही. सध्या सुरु असलेला संघर्ष ‘दोन विचारधारांचा आहे. एकीकडे काँग्रेस संविधानाचा विचार आणि दुसरीकडे आरएसएसची विचारधारा आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने नवीन मुख्यालयाचे उद्घाटन अतिशय योग्य वेळी केले आहे. ही इमारत साधारण नसून, या इमारतीच्या उभारणीत आपल्या देशाची माती आणि लाखो लोकांचे बलिदान आणि कष्ट समाविष्ट आहेत. संविधान देशाच्या स्वातंत्र्यचळवळीचे फळ आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच विशिष्ट मूल्यांचे समर्थन केले असून, या इमारतीत त्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे. काँग्रेसने नेहमीच लोकांसोबत काम केले आहे. त्यांनी या देशाचे यश संविधानाच्या पायावर उभारले आहे. तर, याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सरसंघचालक भागवत यांच्या विधानाचा निषेध करतो. तसेच, जर ते अशी विधाने वारंवार करत राहिले,तर त्यांना भारतात वावरणे कठीण होईल. संघ आणि भाजपाच्या लोकांना १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य आठवत नाही. कारण त्यांच्या वैचारिक पूर्वजांचे स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नव्हते.