मुंबई- एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेले दिवंगत स्टेन स्वामी यांना सर्व आरोपातून दोषमुक्त करण्याची याचिका सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य फ्रेझर मस्करहेन्स यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हा खटलच्या सुनावणीतून मला मुक्त करा असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या सुनावणीतून माघार घेतली आहे.
या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठासमोर होणार होती. या आधीच न्यायमूर्ती डेरे यांनी ही विनंती केली. फादर असलेले स्वामी हे आदिवासी हक्क कार्यकर्ते होते. त्यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक करुन तळोजा न्यायालयात ठेवले होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
२०२१ मध्ये मस्कराहेन्स यांनी स्वामी यांचे नाव आरोपीच्या यादीतून वगळण्याची मागणी विशेष तपास पथकाच्या न्यायालयात केली होती. त्यांच्या कोठडीतील मृत्यूची चौकशी करण्याची त्याचप्रमाणे त्यांचा मृत्यू सुनावणीच्या पूर्वी झाल्यामुळे त्यांना आरोपी समजण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. जर सुनावणी पूर्ण झाली नसेल तर व्यक्तीला आरोपी समजण्यात येऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचाही दाखला त्यांनी दिला होता. मंगलोर येथील एका उद्यानाला स्टेन स्वामी यांचे नाव देण्याला एका राजकीय पक्षाने विरोध केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी तातडीने करण्याची मागणी करण्यात आली असून त्यातून त्यांची प्रतिष्ठा जपली जावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.