परभणी – परभणीत संविधान अवमानना प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथ सुर्यवंशी या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्याला न्याय देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी कालपासून परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. काल हा मार्च परभणीतून निघाला असून त्यांनी आपला पहिला मुक्काम कुंभकर्ण टाकळी येथे केला. आज हा मार्च पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी. तसेच सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पूर्नवसन करावे, त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी. निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशा विविध मागण्यांसाठी हा मार्च काढण्यात आला आहे. हा मार्च आज जिंतूर तालुक्यातील बोरीकडे रवाना झाला. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग आहे.